पुणे : आता घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑन- लाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, आत्तापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती.
प्रामुख्याने अनेकदा शेजारच्या घरात मांजर पाळल्याचा त्रास झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत असतात. काही ठिकाणी एका घरात दहा ते पधरा मांजरे पाळली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पाळलेल्या मांजरीवरून झालेले वाद पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कुत्र्यानंतर पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मांजराची नोंदणी करण्यासाठी 50 रुपये इतके वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करून 50 रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.