हडपसर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांची हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या पटांगणात रविवारी (ता.५) सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जाहीर सभा (Public Meeting) होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अन्वर शेख (Dr. Anwar Sheikh) यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहे. या सभेला पुणे शहरासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी, हडपसर आदी भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. असे डॉ. अन्वर शेख यांनी सांगितले.
हडपसर येथील सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर आपली भूमिका काय मांडणार व मतदानाचा कौल कसा आपल्या बाजूने फिरवणार ते पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार, पुणे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी, पुणे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष कमलेश उकिरंडे आणि हडपसर विभाग अध्यक्ष विश्वास गदादे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही या निवडणुकीत रणशिंग फुंकून प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरु केली आहे.