पुणे : लातूर जिल्हयातील सेवालय आश्रम या संस्थेमध्ये 100 पेक्षा अधिक एचआयव्हीग्रस्त मुलेमुली राहतात. संगोपन करताना येणाऱ्या अडचणी, त्यांना लागणारा औषधोपचार, त्यांचे करावे लागणारे पुनर्वसन, त्यांचे विवाह करताना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण या समाजात जीवन जगत असताना, आपणही समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने या संस्थेसाठी एक लाखाची आर्थिक मदत करण्यात आली.
पुण्यातील संत गाडगे महाराज उद्यान येथे सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संघटनेच्या सस्नेह मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमांत संघटनेच्या वतीने सेवालय संस्थेचे संस्थापक रवी बापटले यांना 1लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष दिपक चव्हाण, माजी राज्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे, पुणे जिल्हा शाखेचे श्रीनिवास कंडेपल्ली, सचिन तारु, सचिन तांबोळी, विनायक राऊत, प्रकाश धानेपकर, अंकुश आटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिपक चव्हाण म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचारी हे माझे आईवडील असून जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत अशाच प्रकारचे सेवानिवृत्तांचे स्नेहमेळावे आयोजित करणार आहे. सेवानिवृत्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हयातील संघटनेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहतील. त्याचबरोबर संघटना आपली सामाजिक बांधिलकी जपत, अनाथ मुलांसाठी काम नेहमी निस्वार्थपणे काम करीत राहणार आहे. अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान, या स्नेह सोहळ्यात सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनी विविध कला गुणदर्शन दाखविले. काहींनी गाणे गायले तर काहींनी मिमिक्री केली. काहींनी जोक्स सांगितले. काहींनी अभंग गायले काहींनी त्यांच्या जीवनात उद्भवलेल्या प्रसंगावर कशाप्रकारे मात केली त्यांचा जीवन प्रवास सांगितला. यावेळी महसूल खात्यातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले 300 पेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा अस्वाद घेत नंतर सर्वांनी पुन्हा भेटण्याची ग्वाही देत एकमेकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध निवेदक संजय पोमण यांनी केले.