पुणे : स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेतील अभाव समोर आला आहे.या घटनेनंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महामार्गांवरील संवेदनशील बस थांब्यांवर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गांवरील थांब्यांवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कायम असून या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित ठिकाणी पोलिसांचे गस्त वाढविण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीत एसटी’ महामंडळाचे महामार्गांलगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बस थांबे आणि निवारे उभारण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरीकांना सुलभ प्रवास करण्यासाठी १०० पेक्षा अधिक थांब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या बस थांब्यावर ग्रामीण भागातून शहरात किंवा नगराच्या ठिकाणी व्यवसाय, नोकरी किंवा शिक्षणानिमित्त शेकडो प्रवासी दैनंदीन ये-जा करत असतात. आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या बस थांब्याच्या ठिकाणी ही पोलिसांचें गस्त वाढवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान आता महामार्गाच्या बस थांब्यावरही पोलिसांचे गस्त तैनात करण्यात येणार आहेत.एसटी महामंडळाच्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीतील १०० पेक्षा अधिक बस थांबे आहेत. यापैकी काही थांबे महामार्गालगत असून संवेदनशील बस थांबे निश्चित करून त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.







