पुणे : पुण्यातील वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुका 28 तास सुरू होत्या. शहरात 8 हजार अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. विसर्जन मिरवणुकीत यंदाही डीजेचा दणदणाट, डोळ्याला त्रासदायक लाईटस बेसुमार वापर करण्यात आला होता. पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काही मंडळांकडून उल्लंघन करण्यात आले. ज्या ठिकाणी या नियमांचे उल्लंघन केले गेले त्या ठिकाणी कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषेदत दिला आहे.
अमितेश कुमार म्हणाले कि, पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक ३ वाजता संपल्या आहेत. अंदाजे 28 तास मिरवणूक शांततेत पार पाडली. पोलिसांनी विना अडीअडचणी मिरवणूक पार पडली. मोठा जनसमुदाय या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता. आम्ही लेसर बाबत बंदी घातली होती. ज्यांनी लेझर वापरले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे. ध्वनिवर्धक आवाजाच्या मर्यादेबाबतही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मोबाईल चोरी घटना कमी घडल्या आहेत. त्या सर्व बाबत कारवाई करून चोऱ्या उघडकीस आणू. तसेच महिला सुरक्षा बाबत पोलिसांनी उत्तम काम केलं. यामध्ये काही घटना घडल्या असतील तर त्यावर देखील कारवाई करू असं आयुक्त अमितेश कुमार यावेळी म्हणाले आहेत. पुणेकरांचे आणि बाहेरून आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आभार त्यांनी यावेळी मानले आहेत.