मंचर : वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसतानाही हा व्यवसाय करणाऱ्या दीपमाला हरीश खामकर यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर शहरातील तक्रारदार हे हरीरूप डेंटल क्लिनिक मंचर येथे दातांच्या उपचारासाठी गेले होते. तेथे असलेल्या डॉ. हरीश खामकर यांच्या पत्नी दीपमाला हरीश खामकर यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना त्यांनी तक्रारदार यांच्यावर उपचार केले. लेटरहेडवर औषधे लिहून देऊन फी स्वरूपात बाराशे रुपये घेतले.
त्यानंतर तक्रारदार यांनी तालुका आरोग्य अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे सदर बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात लेखी तक्रार दिली. गटविकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली होती. त्या अनुषंगाने गठीत केलेल्या चौकशी समितीने या घटनेबाबत दि.२८ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. त्यानंतर डॉ. खामकर व दीपमाला खामकर यांच्याविरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी तक्रार दिल्यावरून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे.