इंदापूर (पुणे): इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावाच्या हद्दीतील लोंढेवस्तीलगत असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाळूउपसा करणारी फायबर बोट नष्ट करण्यात आली. तसेच दोन ब्रास वाळू पुन्हा नदीमध्ये ओतण्यात आली. ही कारवाई तहसीलदार व महसूल विभागाच्या पथकाने केली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पिल्या ऊर्फ सौरभ वाघमारे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. मंडल अधिकारी श्याम झोडगे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, मंडल अधिकारी औदुंबर शिंदे, तलाठी अशोक पोळ, वैशाली कारंडे, कांता देशमुख, मनीषा पोळ, राजश्री ढमे, वैभव मुळे, भास्कर घोळवे, पोलीस कर्मचारी वैभव गरड, सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.
सरडेवाडी गावाच्या हद्दीत लोंढेवस्ती येथे उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात फायबर बोटीद्वारे वाळूचोरी होत असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला असता फायबर बोटीतून वाळूउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले. महसूल विभागाच्या पथकाचा सुगावा लागल्यानंतर पिल्या व त्याचे साथीदार पळून गेले. महसूल विभागाच्या पथकाने ती बोट ताब्यात घेत नष्ट केली आणि त्यातील दोन ब्रास वाळू नदीत पुन्हा ओतली. या प्रकरणी पिल्या वाघमारे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.