कोल्हापूर : सोशल मीडियावर रिल्स करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रकार एका माजी विद्यार्थ्याने केला, मात्र त्यामुळे मुख्याध्यापकांनाच नागरिकांनी धारेवर धरले आहे. करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटातील डायलॉगवर रिल्स केल्याची धक्कादायक घटना घडली. पंधरा दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, मुख्याध्यापकांनी आपणच फोटो काढण्यासाठी परवानगी दिली होती, अशी धक्कादायक कबुली दिली. विशेष म्हणजे या प्रकाराची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांनी तत्काळ खुलासा मागवला असून मुख्याध्यापकांवरील निलंबनाची कारवाई अटळ असल्याची चर्चा सुरू होती.
आपल्या शाळेमध्ये कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठीची जबाबदारी सर्वच घटकांची आहे. मात्र तरीही चार-दोन जण येतात आणि परिसरात व्हिडीओ चित्रण करतात. वर्गात जाऊन खुर्चीला लाथ मारतात आणि डायलॉगबाजी करतात. तरीही हे शिक्षक, मुख्याध्यापक कोणाच्याच लक्षात येत नाही, हे आकलनापलीकडचे आहे. आता शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांना विचारता त्यांनी हा प्रकार गंभीर असून त्याची दखल घेणार असल्याचे सांगितले. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत खुलासा देण्यास सांगितले आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. असा प्रकार पुन्हा कुठे घडू नये, यासाठी कडक कारवाईही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.