पुणे: राज्यात पीकविमा योजनेत झालेल्या बनावट प्रकरणांची चौकशी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले आहे. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील प्रकरणे तपासली जात आहेत. यातील वस्तुस्थिती समोर आल्यानंतर बनावट अर्जदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
नुकताच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परभणी जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर परळीतील व्यक्तींनी बोगस पीकविमा काढून मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला, असा प्रश्न कोकाटे यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यातील बनावट अर्जदार सापडले तर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात येतील.
तर, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येणार असल्याच्या प्रश्नावर डॉ. माणिकराव कोकाटे म्हणाले की, दोन्ही पवार एकत्र येणार असतील तर ते चांगलेच आहे. त्यामुळे पक्ष आणखी वाढणार आहे. शरद पवार यांनी देशाचे कृषिमंत्रिपद भूषवले आहे. राज्यात मला कृषिमंत्री महणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या कामासाठी मी शरद पवार यांचा सल्ला घेणार आहे.