पुणे : गेल्या सात वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी येरवडा कारागृहातून पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल मेघदास पटेनिया (वय-३५, रा. मु़ पो. म्हारलगाव, पो. वरल, राधाकृष्णनगरी, टिटवाळा, कल्याण, जि. ठाणे) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंगाधिकारी राजेंद्र वसंत मरळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अनिल पटेनिया याला खुन केल्या प्रकरणी २ जून २०१६ रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावरील गुन्ह्याच्या खटल्याचा निकाल लावून त्याला एक वर्षापूर्वी म्हणजे १२ डिसेंबर २०२३ रोजी जन्मठेप तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला सुरुवातीला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी ठेवण्यात आले होते.
दरम्यान, त्यानंतर त्याला १५ जून २०२४ रोजी नाशिक येथून येरवडा येथील कारागृहात हलविण्यात आले. आरोपी अनिल याचे वर्तन पाहून त्याची खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, बुधवारी दुपारी जेव्हा कैद्यांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी अनिल पटेनिया हा कारागृहातून पळून गेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.