अलिबाग : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील वित्त अधिकारी ओंकार अंबपकर याला ठेकेदाराकडून ८१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, यात आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
एका बांधकाम ठेकेदाराने विद्यापीठातील डिप्लोमा विभागातील सभागृहाचे बांधकाम केले होते. त्याचे ६७ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी वित्त अधिकारी अंबपकर यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यात तडजोडीअंती लाचेची रक्कम ८१ हजार रुपये निश्चित झाली. दरम्यानच्या काळात संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्याकडे तक्रार केली. या विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ठेकेदाराकडून विद्यापीठातील वित्त विभागाच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना अंबपकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.