मावळातील भाविकांच्या बसला पंढरपूरजवळ अपघात; चिमुरडीसह महिलेचा मृत्यू, ३२ जण जखमी
वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनसाठी जात असलेल्या भाविकांची खासगी बस व मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात जान्हवी ऊर्फ धनू विठ्ठल म्हाळसकर (७ वर्षे) आणि बिबाबाई सोपान म्हाळसकर (वय-५५) या दोघींचा मृत्यू झाला, तर चालकासह ३२ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
जखमी व्यक्तींना उपचारासाठी पंढरपूर व सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लहान मुलगी आणि आजीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना रविवारी (दि. २९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भटुंबरे (ता. पंढरपूर) गावानजीक घडली आहे.
नेमकं काय घडलं?
मावळ तालुक्यातील नाणेगावातील भाविक शनिवारी (दि. २८) रात्री बसने (एमएच १४ एलएस ३९५५) पंढरपूर, तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. या बसची पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकशी (क्रमांक आर. जे. १४ जी. एल. १७८०) समोरासमोर जोरदार धडक झाली. भटुंबरे हद्दीतील ह.भ.प. तुकाराम खेडलेकर महाराज मठाच्या समोर हा अपघात झाला. अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.
हा अपघात झाला तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाल्याने गावकरी धावत आले. यावेळी अनेक जखमी ओरडत होते. ग्रामस्थांनी त्यांना बसमधून बाहेर काढले. जखमींना पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पथकाकडून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बसमध्ये ३४ भाविक होते.
त्यापैकी २१ जण नाणेगावातील म्हाळसकर परिवारातील होते, तर इतर भाविक शिळाटणे, पिंपळोली, टाकवे खुर्द आणि खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील होते. दरम्यान, बसला अपघात झाल्याची बातमी समजताच नाणेगावातील ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. गावातील प्रमुख मंडळींनी पंढरपूरकडे धाव घेतली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.