Accident : शाळेतून सुटी झाल्यानंतर घराकडे निघालेल्या दोन जिवलग मैत्रिणींवर काळाने घाला घातला आहे. सोलापूर जिल्हातील मोहोळ-कुरुल रस्त्यावरील नजिक पिंपरी गावाजवळ भरधाव टेम्पोने स्कुटीला दिलेल्या भीषण धडकेत दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात शोककळा पसरली असून, प्रज्ञा कोकाटे आणि स्नेहल वाघमोडे अशी या मृत मुलींची नावे आहेत. (Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७, रा. कुरुल) ही अकरावीत शिकत होती, तर तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १८) ही बारावीत शिक्षण घेत होती. प्रज्ञा ही मोहोळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती, तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर प्रज्ञा आपल्या स्कुटीवरून स्नेहलला सोबत घेऊन मोहोळकडून कुरुल गावाकडे जात होती.

नजिक पिंपरी गावाच्या परिसरात आल्यानंतर समोरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला. तर स्नेहल वाघमोडे ही गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन तरुण मुलींच्या अशा अचानक जाण्याने कुरुल गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.








