पुणे : चोरीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून तब्बल २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औंध पोलीस चौकीजवळ रविवारी (ता.७) रंगेहाथ पकडले आहे.
प्रशांत विठ्ठल जाधव (वय ५० पद- पोलीस हवालदार, चतुःशृंगी, पुणे शहर ) आणि अजित शांताराम गायकवाड (वय ३७, पद-पोलीस शिपाई, संलग्न वाहतूक विभाग, चतुःशृंगी, पुणे शहर) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आतेभावाचे विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगून चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी प्रशांत जाधव व अजित गायकवाड यानी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने औंध पोलीस चौकीजवळ सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार हजाराची लाच स्वीकारताना प्रशांत जाधव व अजित गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दोघांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी प्रशांत जाधव व अजित गायकवाड यांना अटक करून पुणे येथील विशेष न्यायालय हजर केले असता, त्यांना दिनांक बुधवार (ता. ०९) पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करीत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.