पुणे : जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तीस वर्षांच्या तरुणाला खेड-राजगुरुनगर येथील विशेष न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पीडित मुलाला भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
ही घटना १ जानेवारी २०२२ रोजी जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता तक्रारदारांचा मुलगा जिममध्ये गेला. तो एकटा व्यायाम करत असताना आरोपी तिथे आला. आरोपीने जिमचे दार-खिडक्या लावून घेत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत मुलाने रडत रडत घर गाठले. आईने विचारणा केली असता, त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे धाव घेतली.
याप्रकरणी आरोपीविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला अटक करून त्याविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. खटल्यात विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने अनैसर्गिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमानुसार गुन्हा केल्याचे सरकार पक्षाने निःसंशय सिद्ध केल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.