नवी दिल्ली: पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी योगगुरू रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आयुर्वेद आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात हजर राहून त्यांच्या वर्तनाबद्दल माफी मागितली. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या माफीने समाधानी न होता त्यांना फटकारले आणि न्यायालयाच्या आदेशाची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले. सुप्रीम कोर्टाने अतिशय कडक शब्दात म्हटले आहे की, ‘देश सेवेची सबब बनवू नका. मग ते सर्वोच्च न्यायालय असो वा देशाचे अन्य कोणतेही न्यायालय, तुम्ही आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.
न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्याची सुनावणी झाली. या दोघांच्या वतीने वकील बलबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे सांगितले. त्यावर खंडपीठाने विचारले की रामदेव यांचे प्रतिज्ञापत्र कुठे आहे?
प्रतिज्ञापत्रावर सर्वोच्च न्यायालय संतापले
दोघेही हजर झाले का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा केला. त्यावर त्यांच्या वकिलाने सांगितले की, दोघेही न्यायालयात हजर आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्यांनी दोन प्रतिज्ञापत्रे दाखल करायला हवी होती, पण एकच केले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, ‘आम्ही कंपनी आणि एमडींना उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. जेव्हा उत्तर दाखल केले नाही, तेव्हा आम्ही त्यांना अवमान नोटीस बजावली.’
सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि स्वामी बाळकृष्ण यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोर्ट म्हणाले, ‘न्यायालयाचे आदेश हलक्यात घेता येणार नाहीत. तुमच्याकडून आश्वासन देण्यात आले आणि नंतर त्याचे उल्लंघन करण्यात आले. हा देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाचा अपमान आहे आणि आता तुम्ही माफी मागत आहात, हे आम्हाला मान्य नाही.
कोर्ट म्हणाले, ‘तुमची माफी पुरेशी नाही. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती आणि तिथे पतंजलीच्या जाहिराती छापल्या जात होत्या. तुमचे माध्यम विभाग तुमच्यापेक्षा वेगळे नाही, तुम्ही असे का केले? नोव्हेंबरमध्ये तुम्हाला इशारा दिला होता, तरीही तुम्ही पत्रकार परिषद घेतली. 21 नोव्हेंबरच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही दुसऱ्या दिवशी कंपनी, बाळकृष्ण आणि रामदेव यांनी पत्रकार परिषद घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘न्यायालयाच्या आदेशानंतर 24 तासांच्या आत रामदेव यांनी पत्रकार परिषद घेतली. जाहिरातीत तुम्ही प्रवर्तक म्हणून दिसता. आता 2 महिन्यांनी कोर्टात हजर झाले. यावर रामदेव यांचे वकील म्हणाले, ‘भविष्यात असे होणार नाही. आधी झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो. यानंतर रामदेव यांनी कोर्टाची माफीही मागितली.
मात्र, यावर सर्वोच्च न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने म्हटले, ‘सर्वोच्च न्यायालय असो किंवा देशाचे कोणतेही न्यायालय. आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हीही सशर्त माफी मागत आहात? आम्ही अवमानाची कारवाई करू, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आम्ही माफी स्वीकारू शकत नाही, तुम्ही काय केले आहे. तुम्हाला त्याबद्दल काहीच कल्पना नाही. यावर रामदेव यांच्या वकिलाने हात जोडून सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली.