पुणे- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती आणि अभिषेक तृतीय पंथीयांच्या हस्ते आज शुक्रवारी (ता.२) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. यावेळी शंभरहून अधिक तृतीय पंथीयांनी हजेरी लावली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे हे १३० वे वर्ष आहे. धार्मिक कार्यक्रमास बोलवून तृतीयपंथी यांना सामाजिक बांधीलकी आणि समानतेचा संदेश देण्याचा अनोखा उपक्रम या ट्रस्टद्वारे राबविण्यात येतो. गणेशोत्सव काळात दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीय पंथीयांच्या हस्ते आरती आणि अभिषेक करण्यात येतो. यासाठी तृतीयपंथी भगिनी या गणेशोत्सवाची दरवर्षी वाट पाहात असतात. ट्रस्टने यावर्षी तृतीय पंथीयांच्या मंगलमुखी चारीटेबल ट्रस्टला बोलाविले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती आणि अभिषेक तृतीय पंथीयांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी तृतीय पंथीयांचे बाबा गुरु, दीपा दीदी, काजल दीदी, रमोला दीदी, लाची दीदी,रेणुका दीदी,आशिका दीदी, कादंबरी दीदी, स्वीटी सिंग आदी उपस्थित होत्या.यावेळी सर्व तृतीयपंथी भगिनींना एक एक झाडाचे रोपटे देऊन निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील गुरू स्वीटी सिंग म्हणाल्या कि, समाजात वावरताना समानता, हक्क आणि अधिकार याची सांगड घालून धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी तृतीयपंथी समाज सदैव तत्पर असतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करण्याचा आम्हाला मान मिळाल्याने सर्वात प्रथम ट्रस्टचे आभार मानते. मांगल्याची देवता श्री गणेश मूर्तीची मनोभावे पूजा अर्चना करून सर्वांना निरोगी दीर्घायुष्य आणि सुख, शांती, समाधान मिळावे. अशी श्रींच्या चरणी प्राथना करते.