नवी दिल्ली: माझ्या नवी दिल्ली या विधानसभा मतदारसंघात तब्बल १०,००० नवे मतदार वाढले असून सुमारे ५,००० मतदारांची नावे वगळली, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. मतदार वाढणे व ते कमी होणे या बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारसुद्धा नाही, असा टोला केजरीवालांनी लगावला. दुसरीकडे, दिल्लीत आपकडून बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लिमांची मतदार म्हणून नावनोंदणी सुरू आहे, असा जोरदार पलटवार भाजपचे प्रवक्ते मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या मतदारांची नावे नोंदवली जात असल्याच्या मुद्यावरून आप व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू झाली आहे. आपचे प्रमुख तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान करण्याचा भाजपचा इरादा आहे. मागील १५ दिवसांत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात १० हजार मतदार अचानक वाढले. २९ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर दरम्यान २,७७६ मतदार वाढले तर २५ डिसेंबरपर्यंत ७,८७६ नव्या मतदारांची भर पडली. गत ४ दिवसांत नवमतदारांचा आकडा हा १० हजारांच्या घरात पोहोचल्याचा दावा केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
माझ्या मतदारसंघात एकूण १ लाख ६ हजार मतदार आहेत. यापैकी ५ टक्के मतदारांची नावे रद्द करीत ७.५ टक्के नवी नावे समाविष्ट केली जात आहेत. देशात निवडणुकीच्या नावाखाली खेळ सुरू आहे. १२ टक्के मतदारांची बेरीज-वजाबाकी होत आहे. जर मतदारांमध्ये एवढा मोठा फेरबदल होत असेल तर मग निवडणूक का घेत आहात? असा संतप्त सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. मतदारांची नावे वगळणे, बोगस मतदारांची नावे जोडणे व पैसे देऊन मत खरेदी करण्याची चाल भाजप खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर, भाजपने माझ्या पत्नीचे नाव नवी दिल्ली मतदारसंघातून वगळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला.
दरम्यान, दिल्लीत कोणताही घुसखोर मतदान करणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. पण, दस्तुरखुद्द केजरीवाल व त्यांच्या पक्षाने प्रत्येक मतदारसंघात ८ ते १० हजार बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्या मुस्लिमांची मतदार म्हणून नावनोंदणी केल्याचा आरोपही सिरसा यांनी केला.