पुणे : मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकारांचा विवाहसोहळा गेल्या काही दिवसांत थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली आहे. नुकतेच कौमुदी आणि आकाशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कौमुदीने लग्नाचे फोटो शेअर करत त्यावर ‘साथ सात जन्माची’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा गेल्या वर्षाच्या अखेरीस पार पडला होता. यानंतर कौमुदी विवाहबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आता आलेला आहे. कौमुदी आणि आकाश यांचा लग्नसोहळा थाटामाटात पडला आहे.
आपल्या लग्नासाठी कौमुदी आणि आकाशने खास पारंपरिक पेहरावाला पसंती दिली आहे. आकाशी रंगाची नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज असा श्रृंगार कौमुदीने केला आहे. तर आकाशने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. नववधू कौमुदी आणि आकश या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहेत.