कोल्हापूर : लेझर लाइटमुळे दोघेजणांच्या डोळ्याला इजा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पा विराजमान झाले आहेत. अलीकडे सार्वजनिक गणेश आगमन मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये लेझर लाइटचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. मात्र या लेझर लाइटचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोल्हापुरातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यामधून लेझर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाल्याची घटना घडली आहे. तसेच, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस हवलदाराच्या डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. युवराज पाटील असे या हवालदार पोलिसांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गणपती आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत हा तरुण सहभागी झाला होता. त्यावेळी लेझर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाले आहे. हा तरुण उचगाव येथील रहिवाशी आहे. त्याच्यावर शास्त्रीनगर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी गणेश मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे असलेल्या एका पोलिस हवालदाराच्या डोळ्याला या लेझर किरणांमुळे इजा झाली आहे. या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेश विसर्जन असो किंवा मिरवणूक यामध्ये लेझर शो वापरावर बंदी घालण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश आगमन मिरवणुकीमध्ये लेझर शो मोठया प्रमाणात वापरल्याच निदर्शनास आले आहे.
लेझर लाइट व डीजेचा आवाज या दोन्ही गोष्टींमुळं मानवी शरीराला इजा होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. डिजेच्या आवाजामुळे हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडत आहेत. अशातच आता लेझर लाइटमुळे दोघा जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.