लोणी काळभोर : मागील चार पाच वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती) येथील एबीके अंबिका ज्वेलर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या सोन्याच्या दुकानातील दागिन्यांची चोरी झाली आहे. रविवारी (ता.22) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दुसरी तिसरी कोणी केली नसून तर दुकानात काम करणाऱ्या कामगारानेच केली आहे. दुकानातील सुमारे 4 लाखांचे सोन्याचे दागिने चोरून कामगार लंपास झाला आहे.
अमोल विठ्ठल गवळी (वय-23, सध्या रा. पांडवदंड, फुरसुंगी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुवर्ण पेढीचे मालक बाबासाहेब वामन गायकवाड (वय-47, वाकवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब गायकवाड हे कदमवाकवस्ती येथील रहिवासी असून एक व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात एबीके अंबिका ज्वेलर्स या नावाने सुवर्ण पेढी आहे. या दुकानातून सोने चांदी खरेदी विक्री केली जाते. आणि दुकानातील कामगार सोने विक्रीचे काम करतात.
फिर्यादी यांच्या दुकानातील कामगार अमोल गवळी याने दुकानातील 6 सोन्याच्या चैन चोरी करून पळून गेला आहे. सोन्याच्या चैनीचे वजन व कंसात रक्कम पुढील प्रमाणे आहे. 1) 8 ग्रम 7.70 मिली (66 हजार 652 रुपये), 14 ग्रॅम 800 मिली (1 लाख 12 हजार 480 रुपये), 5 ग्रॅम 110 मिली (39 हजार 444 रुपये), 5 ग्रॅम 930 मिली (45 हजार 68 रुपये), 8 ग्रॅम 500 मिली (64 हजार 600 रुपये) व 14 ग्रॅम 230 मिली (1 लाख 8 हजार 148) असा एकूण 4 लाख 36 हजार 392 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले आहे.
याप्रकरणी अमोल गवळी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी करीत आहेत.