पिंपरी-चिंचवड : अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही आहे. रस्ता ओलांडत असणाऱ्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. त्यानंतर ती महिला हवेत फेकल्या जाऊन रस्त्यावर पडली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.
रेखा जिवाराम चौधरी (वय ४०, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून, ही घटना बुधवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले. त्यानंतर पोलिसांनी चालक असलेल्या पोलिस पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांचे पती जिवाराम चौधरी (वय ४४, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी), यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनय विलास नाईकरे (वय २३, रा. प्रेस्टीन ग्रीन सोसायटी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी रेखा आणि मुलगी बुधवारी दुपारी स्वराज रेसिडेन्सी समोर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपी चालवत असलेल्या भरधाव कारने रेखा यांना धडक दिली. ज्यामुळे त्या काही फूट उंचावर उडून रस्त्यावर फेकल्या गेल्या. नागरिकांनी तात्काळ त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. रेखा याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून कंबरेचे हाड मोडले आहे. अपघातानंतर विनय नाईकरे याने जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.
पोलीस पुत्र असल्याने तर्कवितर्क
कारचालक असलेल्या आरोपीचे वडील विलास नाईकरे, हे पोलीस दलात नोकरीला असून सध्या एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. दरम्यान, अपघातानंतर २४ तास उलटूनही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे उलट सुलट तर्कवितर्क लावले जात आहेत.
अपघातानंतर पोलीस रुग्णालयात गेले होते. मात्र, नातेवाईक तक्रार देण्यास नकार देत होते. दरम्यान, गुरुवारी (दि. १३) दुपारी महिलेचे पती पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– गणेश जामदार, वरिष्ठ निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे.