पुणे : रायगडावर पिंडदान केल्यावरून सध्या वाद पेटला आहे. त्यामुळं आता शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा कार्यक्रम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेडनं दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या प्रकरणात कारवाई करण्याची आणि गडावर अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर विधीसाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे.
संभीजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र…
या प्रकरणानंतर आता दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, रायगडवर छत्रपती महाराजांच्या समाधीस्थळी गेल्या काही महिन्यांत काही लोकांनी संशयास्पद विधी केल्याचं आढळून आलं आहे. या लोकांना अटकाव घालण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात, अशा प्रकारांमुळं शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून हे प्रकार पुन्हा होणार नाहीत, यासाठी गृहविभाग व केंद्रीय पुरातत्व विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.