लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur National Highway) एका नामांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्याने रस्सीच्या सहाय्याने फॅन ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (Loni Kalbhor) (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर मळा परिसरात बुधवारी (ता.1) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
शंकर मोहनराव शिंदे (वय -२७, सध्या, लोणी काळभोर, मुळ रा. मुरखेड नागेली जिल्हा नांदेड) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील राजेंद्र कदम (बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर शिंदे हा मागील दीड वर्षापासून हॉटेल पाटील वाडामध्ये वेटर म्हणून काम करीत होता. शिंदे हा इतर कर्मचाऱ्यांसह हॉटेलच्या रूममध्ये राहत होता. दरम्यान, शिंदे यांच्या मित्राचा मंगळवारी (ता.30) वाढदिवस होता. यासाठी शिंदे याने गिफ्ट ही घेतले होते. शिंदे हा मित्रांसोबत वाढदिवसाला गेला नाही. त्याने रूम पार्टनर सोबत गिफ्ट पाठवून दिली. मात्र तो वाढदिवसाला गेला नाही. आणि एकटाच रूममध्ये झोपला.
दरम्यान, वाढदिवसाला गेलेले मित्र बुधवारी (ता.1) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रूम मध्ये आले. तेव्हा रूम चा दरवाजा आतून बंद होता. मित्रांनी जोरजोरात आवाज दिला, दरवाजा वाजविला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मित्रांनी दरवाजा तोडला असता, आणि घरात पाहिले असता, शंकर शिंदे हा फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
स्वप्नील कदम यांनी या घटनेची माहिती त्वरित लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे, शिवाजी दरेकर, सोमनाथ गळाकाटे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शंकर शिंदे यांना खाली काढले.
त्यानंतर शिंदे यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शंकर शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शिंदे याने आत्महत्या का केली? त्यादृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.