पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे-दिघी महामार्गावर दुचाकीने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३१) घडली आहे. दुर्गेश काशीनाथ हंबीर असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर निकेश किशोर बांगारे असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुर्गेश आणि निकेश हे दोघे दुचाकीने निजामपूर ते माणगाव मार्ग असा प्रवास करीत होते. या वेळी दुर्गेश हंबीर हा भरधाव दुचाकी चालवित होता. या वेळी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुर्गेश याचा जागीच मृत्यू झाला तर निकेश हा गंभीर जखमी झाला आहे.
त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती बोन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.