पुणे : काशीद समुद्रकिनारी नववर्ष साजरे करण्यासाठी गेलेल्या पुण्यातील एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रतीक सहस्रबुद्धे असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (31 डिसेंबर) साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण काही काळ शोकाकूल झाले होते.
पुण्यातील जैनवाडी जनता वसाहतील प्रतीक सहस्रबुद्धे त्याच्या मित्रांसोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड-काशीदमध्ये आला होता. दुपारी साडेतीन वाजता ते सर्व समुद्रात पोहत होते. त्यावेळी प्रतीकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. हे चौघेही पुण्यातून रिक्षा घेऊन आले होते. प्रतीकसोबत गणेश नितीन सहस्रबुद्धे, रिक्षाचालक शदाब अविद मलीक आणि राकेश राजू पवार हे मित्र होते. चौघेही समुद्रात पोहत होते.
पोहल्यानंतर स्पोर्ट्स बाईकवर फिरण्याचा त्यांचा बेत होता. त्यासाठी गाडीतून पैसे आणण्यासाठी ते पाण्याबाहेर आले. त्यावेळी प्रतिक सहस्रबुद्धे पाण्याबाहेर आला असेल असे त्यांना वाटले. मात्र, दीड तासानंतर प्रतीकचा मृतदेह पाण्यात तरंगताना लाईफ गार्डने पाहिला. त्यांनी पोलिसांच्या मदतीने प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी ताबडतोब त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.