पुणे : पुण्यातील भारत फोर्ज या कंपनीच्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स या उपकंपनीला स्वदेशी बनावटीच्या तोफांची निर्यात करण्याचे कार्यादेश मिळाले आहेत. देशांतर्गत विकसित केलेल्या १५५ एमएम तोफा निर्यात करण्याचे कार्यादेश कंपनीला मिळाले असून, या व्यवहाराची किंमत तब्बल १५५ दशलक्ष डॉलर आहे.
कंपनीला ‘नॉन-कॉन्फ्लिक्ट झोन’कडून तीन वर्षांच्या कालावधीसाठी १५५ एमएम ‘आर्टिलरी गन’ निर्यात करण्याचे आदेश मिळाले आहेत, असे या पत्रात नमूद आहे. मात्र, कार्यादेश परदेशी ग्राहकाचे नाव, तसेच किती तोफांची निर्यात केली जाणार आहे, याची माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही. कंपनीतर्फे ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ (बीएसई) आणि ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ (एनएसई) या शेअर बाजारांना दिलेल्या पत्रात मिळालेल्या कार्यादेशाची माहिती दिली आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या कंपनीतर्फे नुकतीच लष्करी जवानांना खडतर भूप्रदेशात सुरक्षित व गतिमान हालचालींसाठी मदत करणारी अत्याधुनिक वाहने लष्कराला सुपूर्द करण्यात आली होती. तसेच कंपनी विविध प्रकारच्या तोफा, ड्रोनचे उत्पादन करून सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात मोलाचे योगदान देत आहे.
केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आणि देशांतर्गत विकसित व उत्पादित केलेल्या अद्ययावत संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हे कार्यादेश या प्रयत्नांचा उत्तम पुरावा आहे, असे कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.