पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आईवडिलांच्या कुशीत झोपलेल्या सात महिन्याच्या चिमुकल्याला अज्ञात इसमाने शनिवारी (ता.२७) मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
श्रावण अजय तेलंग असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे आहेत. ते पुण्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. तेलंग दाम्पत्य हे पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात शनिवारी (ता.२७) मध्यरात्री झोपले होते. त्यावेळी दाम्पत्याच्या कुशीत श्रावण झोपला होता. श्रावण याला अनोळखी व्यक्तीने उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, तो कुठेही दिसून आला नाही. त्यानंतर तेलंग दाम्पत्याने त्वरित बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. यामध्ये ७ महिन्यांच्या श्रावणचे अपहरण करणारी व्यक्ती दिसून आली. पोलिस आरोपीची पुणे स्टेशन परिसरातील रिक्षाचालक, उपहारगृहचालक, फेरीवाल्यांकडे चौकशी करीत आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.