खेड (पुणे) : शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी नऊ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना खेड भुमी अभिलेख कार्यालयातील खाजगी टायपिस्ट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनंदा गणेश वाजे (खाजगी टायपिस्ट, भुमी अभिलेख कार्यालय खेड, जि. पुणे. रा. तारकाई डोन, वाडा रोड, ता. खेड, जि. पुणे) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पतीच्या नावाने सावडी (ता. खेड, जि. पुणे) येथे गट नं. २४५ मध्ये एकुण ६३ गुंठे शेत जमीन आहे. या गटाची मोजणी करण्याकरीता तक्रारदार यांच्या पतींनी एक जानेवारी २०२४ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापक अधिकारी खेड यांच्याकडे अर्ज केला होता.
दरम्यान, खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा बाजे या सध्या नगर भूमापन अधिकारी खेड कार्यालयामध्ये खाजगी टायपिस्ट म्हणून काम करतात. खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर काम करण्यासाठी प्रथम १२ हजार रुपये व ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता आणखी दोन हजार रुपये लागतील असे सांगितले.
त्यानंतर तक्रारदार यांनी सदर रक्कम रोख स्वरुपात दिली. तक्रारदार यांच्या पतीचे नावे असलेल्या जमीनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर खाजगी महिला सुनंदा बाजे यांनी तक्रारदार यांना फोन करुन, लोकसेवकाने जमीन मोजणीकरीता आणलेली मशिनचे आणखी ६ हजार रुपये व जमीनीचे कागदपत्र तयार करण्याकरीता तीन हजार रुपये असे लोकसेवकाकरीता एकुण नऊ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खेड भुमी अभिलेख कार्यालयात सोमवारी (ता.२२) सापळा रचला. तेव्हा खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांना तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सुनंदा वाजे यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत.