पुणे : पुणे जिल्ह्यातील पिरंगुट घाटात (Pirangut Ghat) बसला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. घाटामध्ये खासगी प्रवासी बसने अचानक पेट घेतली. यावेळी तात्काळ अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला.
पिरंगुटहून पुण्याकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसने रविवारी रात्री पेट घेतला आहे. पुणे (Pune) शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील जिप्सी हॉटेलजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर प्रादेशिक विभागाच्या (PMRDA) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. बसमधून बसचालक आणि सात प्रवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. उन्हाळ्यात वाहनांचे इंजिन गरम झाल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात.