पिंपरी : गाडीवर दंड आकारल्याचा राग मनात धरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मरकळ चौक, आळंदी येथे घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. विजय नामदेव जरे (वय-३३, रा. गोपाळपुरा, चाकण चौक आळंदी) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंकुश वाडेकर (वय-५४) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर हे मरकळ चौक, आळंदी या ठिकाणी वाहतूक नियमन करीत होते. त्या वेळी आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी यापूर्वी त्याच्या गाडीवर दंडाची पावती केल्याचा राग मनामध्ये धरून, तुला माहीत नाही का, मी स्थानिक आहे. गाडीवर तू पावती का करतो तुला इथे राहायचे नाही का, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी घातलेल्या युनिफॉर्मच्या शर्टाला पकडून शर्टाची बटने तोडली.
वाहतूक पोलिस वाडेकर यांच्या गालावर जोरात चापट मारली. त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्याने फिर्यादीच्या डोक्यात व छातीवर लाथा व बुक्क्याने मारहाण केली. या घटनेमुळे मरकळ चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, आळंदी पोलिसांनी आरोपीला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली असून तपास सरू आहे.