पिंपरी : प्रॉपर्टीच्या वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःच्या आई व बहिणीला अश्लिल शिवीगाळ करून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार काळेवाडी येथे शनिवारी (दि. २८) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत काळेवाडी येथे राहणा-या ५४ वर्षीय बहिणीने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून काळेवाडी पोलिसांनी ५३ वर्षीय भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी आणि त्यांची बहीण यांच्यात आई वडिलांच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहेत. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास आरोपी पोलीस कर्मचारी आपली पत्नी आणि मुलीसह बहिणीच्या घरी आला. त्यावेळी बहिणीच्या घरी आईदेखील होती. त्यावेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. तसेच आरोपीची पत्नी आणि मुलीनेही त्यांना शिवीगाळ केली.
तसेच मी पण पोलीस आहे. मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल. त्यानंतर पत्नी आणि मुलीला म्हणाला की तुम्ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही, तर मी फास लावून आत्महत्या करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.