पुणे : कोथरूड येथील सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या घटनेला उद्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. अशातच आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या दोघांना अटक केली असली तरी या कटात आणखी काही जणांचा समावेश असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची तयारी या अटक करण्यात आलेल्या दोघांनीही केली होती. त्यासाठी त्यांनी पिस्तूल देखील आणले होते. मात्र, त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना दोघांना सापळा रचून अटक केली. या संपूर्ण कटात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस आता तपास करत आहेत. या आरोपींच्या निशाण्यावर कोण होते? त्याच्या या कटात आणखी कोण सहभागी आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
साथीदारांनी भरदिवसा केली होती हत्या
कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ रोजी भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ सोबत सतत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून त्याचा खून केला होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले. तसेच मुळशीतील विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह १७ जनांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.