उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगाने निघालेल्या अज्ञात वाहनाने पायी निघालेल्या एका इसमाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये संबंधित व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. उरुळी कांचन परिसरातील खेडेकर मळा परिसरातील जोगेश्वरी मिसळ परिसरात बुधवारी (ता.15) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या बाजूकडे हा अपघात झाला. अपघातात मरण पावलेल्या पुरुषाचे नाव व वय अद्याप समजू शकले नसून त्यांची ओळख पटू शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम महामार्गावरून पायी चालला होता. याच दरम्यान पाठीमागून अत्यंत भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली आणि चालक वाहनासह अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. धडकेमुळे हा इसम गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताळलेल्या अवस्थेत पडला होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ‘कस्तुरी रुग्णवाहिके’चे चालक माउली लाड आणि संतोष झोंबाडे यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीला तातडीने उचलून एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, दुर्दैवाने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला तपासताच उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम यवत पोलिसांकडून सुरू आहे.







