उरुळी कांचन, (पुणे) : येथील महावीर निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गड किल्ल्यांची माहिती व्हावी, यासाठी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
महावीर निवासी मूकबधिर शाळेतील प्रशासनाने, शैक्षणिक सहल काढण्यासाठी पत्रकारांनी मदत करावी,अशी इच्छा 15 ऑगस्ट 2024 ला प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप यांच्याकडे व्यक्त केली होती. यावर जगताप यांनी आपण सहलीचे नियोजन करा आपणास सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले होते.
दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी इतिहास अभ्यासक खलिल शेख यांच्या संकल्पनेतुन प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (ता. 04) सकाळी 7 वाजता सहलीच्या बसला उरुळी कांचन येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व मारुती मंदिरासमोरून श्रीफळ जगताप यांच्या हस्ते बस मार्गस्त करण्यात आली. यावेळी बसमध्ये एकूण ४० मूकबधिर विद्यार्थी, 6 शिक्षक, पत्रकार अमोल भोसले, इतिहास अभ्यासक खलिल शेख उपस्थित होते.
मुलांच्या चेह-यावर आनंद, उत्सुकता..
शिवनेरीगडाची ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना खलिल शेख यांनी दिली. त्यामुळे या मुलांच्या चेह-यावरील उत्सुकता, आनंद आणि स्फुर्ती पाहिल्यावर आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांचे चिज झाल्याची भावना येथील शिक्षकांनी व्यक्त केली आहे. अष्टापुर (ता. हवेली) येथील सुपुत्र व जून्नरमधील प्रकल्प अधिकारी असणारे सोनुल कोतवाल यांना माहिती मिळताच त्यांनी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. शाळेच्या वतीने सोनुल कोतवाल यांचे आभार मानले गेले.
दरम्यान,सहल संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद आणि समाधान पाहुन आयोजक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी मुख्याध्यापिका स्मिता सपार, शिक्षक बी. एन. भालेराव, अभिजीत तायडे, कविता पवार, पवन राठोड, मीनाक्षी वासनिक, जगदीश पवार, मच्छिंद्र कोतवाल, मंगेश झुरुंगे आदी मान्यवर उपस्थित होते.