नागपूर : शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये वहिनीशी अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून हत्या झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे. पोलिस तपासामध्ये मृत व्यक्ती हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे म्हटले आहे. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल गुप्ता असे आहे.
या प्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी राजन खानला अटक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन राहुल गुप्ताचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राजन आणि राहुल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. संशय घेण्यावरुन त्यांच्यात भांडणदेखील झाले होते. दोघांनीही एकमेकांना जीवे ठार मारणार असल्याची धमकी दिली होती.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजन खान हा आदिवासी प्रकाशनगरमध्ये एका दुकानाजवळ उभा होता. त्यावेळी थोड्या वेळात त्या ठिकाणी राहुल आला. त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्या दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांच्यातील वाद वाढतच गेला आणि ते एकमेकांना मारहाण करु लागले.
दरम्यान, मारहाण करताना राजाने रस्त्याच्या बाजूला पडलेला लाकडी दांडा उचलला आणि जोरात राहुलच्या डोक्यात मारला. वेदनेत कळवळत असलेल्या राहुलला सोडून राजा तेथून पळून गेला. पुढे राहुलने हा झालेला प्रकार त्याच्या मित्राला सांगितला. मित्राने राहुलच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. डोक्याला
जोरदार मार लागल्याचे सांगितले. तेव्हा कुटुंबियांनी राहुलला रुग्णालयात दाखल करायचे ठरवले होते.
मात्र, राहुलने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. ते सर्वजण पुन्हा घरी परतले. घरी गेल्यानंतर राहुल हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबियांनी त्याला जागं करण्याचा खूप प्रयत्न केला. दरम्यान त्याचा रात्रीच मृत्यू झाला होता. त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनीही तो मृत असल्याचे घोषित केले. पुढील तपास कळमना पोलिस करीत आहेत.