बीड: मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध पहिल्यांदाच बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये मोठ आंदोलन सुरू आहे. या सर्व मुद्द्यावर जरांगे म्हणाले. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध बीडमध्ये कधीच काहीही झालं नाही. पहिल्यांदाच या घराण्याच्या मनाविरुद्ध संतोष देशमुख यांच्या हत्तेचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा राग म्हणून माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, माझ्या विरोधत आंदोलन करणारे हे धनंजय मुंडेंचे लाभार्थी आहेत, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे.
आरोपींना संतोष देशमुख यांचा खून पचवायचा होता,असा दावा मनोज जरांगे पाटीलां माध्यमांशी केला आहे.परंतु आम्ही मस्साजोगला बसून गुन्हा दाखल करून घेतला. गुन्ह्यात आरोपींची नावे टाकून घेतली. हीच त्यांची खदखद होती. मुंडेनच्या विरुद्ध आतापर्यंत बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. म्हणून यांची माझ्यावर चिडलेले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.
बीडमध्ये त्यांनी गुंडागर्दीचं स्ट्राँग नेटवर्क तयार केलं आहे. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल झालेली ही पहिलीच केस आहे. नाही तर हे सांगतील त्याच्यावर गुन्हे दाखल होत होते. कुणालाही अटक होत नव्हती. यांना जसं नाचवायचं तसं नाचवत होते. कुणाची शाळा हडप, कुणाचा प्लॉट हडप, शेत हडप, कॉन्ट्रॅक्ट बळकवन, असे प्रकार सर्रासपणे सुरू होते. पण आम्ही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मुंडेंची आमच्यावर नाराजी आहे. म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
माझ्याविरोधात आंदोलन करणारे धनंजय मुंडेंचे लाभार्थी
मुंडे घराण्याने आपल्याच हाताने स्वतःची पत घसरवली आहे. त्यांचा सर्वांनाच त्रास होता. काही ठरावीक लोकं इतरांना त्रास देत होते. जातीचा काही संबंध नव्हता. फक्त काही लोकं सर्वांना त्रास द्यायचे. आता माझ्या विरोधात जे आंदोलन करत आहेत ते या घराण्याचे लाभार्थी आहेत. या लोकांनी ओबीसींचं आरक्षणही खाल्लं आहे. तेच माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आम्ही बोलायचं नाही का धनंजय देशमुखांच्या बाजूने?
मस्साजोगचा आणि कुटुंबाचा प्रमुख गेला. एका पक्षाचा प्रमुख माणूस गेला आहे. म्हणजे तो सरकारचा घटक होता. गेला तर गेला. पण त्याचा तुम्ही खून केला आहे. खून करून त्याच्या भावाला अरेरावी करणं सुरू आहे. त्यावर बोलायचं नाही? तुम्ही इतक्या क्रूरपणे खून केला, त्यावर बोलायचं नाही का? आम्ही कोणता जातीवाद केला? दाखवा बरं? नेते सोडले तर आजपर्यंत या राज्यातील एकाही जातीला मी दुखावलेलं नाही. नेते आमचे असो की तुमचे असो, ते कुणाचेच नसतात. त्यांना बोलायचं नाही? त्यांची मस्ती अशीच चालू द्यायची का? त्यांना खून पाडू द्यायचे का? धनंजय देशमुखचाही खून होऊ द्यायचा का? असा प्लान आहे का तुमचा? आम्ही बोलायचं नाही का धनंजय देशमुखांच्या बाजूने? आम्ही वंजारी, धनगर, आदिवासी, दलित, मुस्लिमांना कधीच काही बोललो नाहीत, असंही ते म्हणाले.
जरांगे,धस,दमानियांवर गुन्हा दाखल करा, मुंडे समर्थकांची मागणी
दरम्यान, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने मुंडे समर्थक एकत्र आले आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. परंतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावर अगोदरच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.