बस्ती : उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित मुलाला नग्न करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तीन दिवस फिर्याद नोंदवून घेतली नाही. उलट त्याचा छळ केल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप होत आहे. या प्रकरणात कपटनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. आदित्य असे या मुलाचे नाव आहे. आपसातील वादातून ही आत्महत्या झाली असावी असा संशय आहे, असे विभागीय पोलिस अधिकारी प्रदीपकुमार त्रिपाठी यांनी सांगितले.
आदित्यच्या कुटुंबीयांनी मात्र आरोप केला की, मृत्यूपूर्वी त्याचा अनन्वित छळ करण्यात आला. त्याचे काका विजय कुमार म्हणाले, हावात या मुलाला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावण्यात आले. हे पूर्वनियोजित होते की नाही हे आम्हाला माहिती नाही. पण तेथे त्याला नग्न करून मारहाण करण्यात आली. त्याच्या अंगावर लघुशंका करण्यात आली. आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलो. मात्र आमची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. एखादी किरकोळ तक्रार नोंदवावी, असा त्यांचा प्रयत्न होता.
ते म्हणाले, ही घटना २० डिसेंबरला घडली. मात्र आम्हाला ती दुसऱ्या दिवशी कळली. आदित्य रात्री उशिरा घरी आला आणि त्याने सकाळी आम्हाला हकीकत सांगितली. आमच्या प्रयत्नानंतरही पोलिसांनी तीन दिवस फिर्याद नोंदवून घेतली नाही. उलट त्याचा छळ केला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस तपास सुरू करण्यात आला.