मुंबई : लाईनमनच्या सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टाळल्याची धक्कादायक घटना कल्याणजवळ मंगळवारी (ता.६) सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास उघडकीस आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने दोन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
मिथुनकुमार आणि हिरालाल अशी रेल्वे कर्मचाऱ्यांची नावे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मिथुनकुमार आणि हिरालाल हे दोघे लाईनमन आहेत. दैनंदिन कामासारखे ट्रॅकची पाहणी करत असताना, त्यांना मंगळवारी (ता.६) सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील डाऊन फास्ट ट्रॅकचा रुळाला तडा गेला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले.
त्याचवेळी डाऊन फास्ट ट्रॅकवरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने अतिवेगाने इंद्रायणी एक्स्प्रेस चालली होती. दोन्ही लाईनमन यांनी प्रसंवधान राखून इंद्रायणी एक्स्प्रेसला रेड सिग्नल अलर्ट दिला. त्यानंतर इंद्रायणी एक्स्प्रेस थांबली. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला आहे. तर दोघांचाही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, मिथुन कुमार यास ट्रॅक फ्रॅक्चर असल्याचे समजले, त्याने हिरालाल यास सतर्क केले, त्यानंतर दोघांनी प्रसंगावधान राखून लांबपल्याच्या गाड्या थांबविल्या. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर काही काळ खोळंबल्या होत्या.