पुणे : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टरमधून श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. बोरीभडक-चंदनवाडी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी (ता. २५) आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाने भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या पालखी क्रमांक १३ वर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होताच संपूर्ण परिसर *”जय बाळूमामा”*च्या जयघोषाने दुमदुमून गेला. आकाशातून उधळल्या जाणाऱ्या फुलांच्या वर्षावात भाविकांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले. हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

या उपक्रमाचे आयोजन बोरीभडक-चंदनवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. पालखी क्रमांक १३ चे कारभारी विशाल सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेली पुष्पवृष्टी ही परिसरासाठीच नव्हे, तर बाळूमामा भक्तांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने उपस्थित भाविक भारावून गेले.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी हा धार्मिक उपक्रम दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, या अनोख्या पुष्पवृष्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.







