कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून येणाऱ्या नवरात्रीमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दोनशे रूपये आकारून दिवसाला एक हजार ई पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुजारी गजानन मुनीश्वर यांनी ई पास निर्णयाला विरोध केला आहे. , पुजारी गजानन मुनीश्वर यांनी या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुनीश्वर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
तसेच, अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. दर्शनासाठी पासेस किंवा प्रवेशपत्रिका वितरित करू नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना ७ सप्टेंबर २०१० ला जाहीर करण्यात आल्या होत्या. १५ ऑक्टोबर २०१० मध्ये मंजूर करून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून मनाई केली आहे. याबाबतचे पत्र देऊनही त्याचा विचार झाला नसल्याचे मुनीश्वर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या काळात अंबाबाई मंदिरात पेड ई पास सुविधा दिली जाणार आहे. तथापि, जिल्हाधिकारी राहुल रेखावार पेड ई पास उपक्रमावर ठाम आहेत. उत्सव काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने हे ई पास दिले जाणार आहेत. दिवसाला फक्त 1 हजार भाविकांना या पेड ई पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे इतर भाविकांची कोणतीही गैरसोय नसल्याचा दावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केला आहे.