बापू मुळीक
सासवड : सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा उत्सव चैत्र कु.1 शके 1947 रविवार दि. 13 ते शनिवार दि. 19 आयोजित करण्यात आला आहे. श्री भैरवनाथ चैत्री उत्सव समितीकडून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
रविवारी 13 देवांना मंदिरात अभिषेक करण्यात येईल, तसेच ध्वज बांधणे, नऊ वाजता पारंपारिक बगाडाचा कार्यक्रम होईल. वाघ डोंगर येथे बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम होणार आहे. भैरवनाथ कुस्ती आखाड्यात कुस्त्याही होणार आहेत. सहकार महर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ, माजी आमदार संजय जगताप यांच्या वतीने शेवटच्या कुस्तीला लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
मंगळवार (दि. 15 )रात्री आठ वाजता पालखीतळ क्रमांक दोन सोपानगर या ठिकाणी’ नाद करा पण आमचा कुठं’ हा आर्केस्ट्रा चा कार्यक्रम होईल. बुधवारी( दि. 16 )रात्री आठ वाजता पालखीतळ क्रमांक एक येथे ‘छावा चित्रपट’ दाखवण्यात येईल. अशी माहिती चैत्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनी दिली. यावेळी भैरवनाथ चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी) जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, विजय जगताप, पोपट जगताप, दिपक जगताप, प्रशांत भैरवकर, गिरी गोसावी महाराज, सुरेश जगताप, तुकाराम गिरमे ,सुरेश शिंदे, बंडूकाका जगताप, वैभव जगताप, बाजीराव इनामके आदी उपस्थित होते.
गीतांचा कार्यक्रम गुरुवार( दि. 17) पुरंदर गोल्डन सिंगर ग्रुप यांचा जल्लोषी चैत्रोत्सवाचा हा मराठी ,हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम तसेच शनिवारी( दि. 19 )सायंकाळी ग्रामरत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे. यामध्ये श्री काळ भैरवनाथ मंदिरासमोर काळ भैरवनाथ ग्रामरत्न व स्वर्गीय नारायण गेनुजी जगताप यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट मंदिर व्यवस्थापन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याच ठिकाणी धन्य सत्संग चा निरंकार या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.