पुणे : पुण्यातील शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. पिकांची उत्पादकता, आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषि प्रक्रियेमधील अद्ययावत पद्धती यामध्ये आमुलाग्र बदल करावेत, जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्याचे आयोजन केले आहे. परदेशातील शेतीविषयक तंत्रज्ञानाचा अभ्यास या दौऱ्यात केला जाणार आहे. फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड यासारख्या देशात अभ्यास दौऱ्यासाठी जाण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने केले आहे.
या देशांत जाण्याची संधी…
या परदेश दौऱ्यात शेतकऱ्यांना विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड, ऑस्ट्रीया, न्यूझीलंड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.
अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी या अटी पाळाव्यात…
अभ्यास दौऱ्यासाठी लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा. शेतकऱ्याचे वय २५ ते ६० वर्षे असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
सरकारकडून ५० टक्के आर्थिक मदत…
शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल. शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचा १०० टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगावू स्वतः भरावा लागेल व दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल.