हडपसर : अरहम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या खाजगी शिक्षण संस्थेमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संस्थेच्या संचालकासह प्रचार्याकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना संस्थेच्या शेवाळवाडी (ता. हवेली) येथील संस्थेच्या कार्यालयात 1 ऑक्टोबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विद्यालय प्रशासनाने पिडीतेला कॉलेजमधून काढून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून पुन्हा एकदा विद्यार्थिनीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
22 वर्षीय पिडीत विद्यार्थिनी शिक्षणासाठी गावाकडून पुण्यात आली होती. शेवाळवाडी येथील एका महाविद्यालयात ती एमबीएच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. महाविद्यालयातील प्राचार्य अमय देशपांडे व संचालक अनिल त्रिपाटी यांनी पिडीतेला कार्यालयाच्या केबिनमध्ये बोलाविले. आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केली. अशी फिर्याद पिडीतेने हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार प्राचार्य व संचालक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती महाविद्यालयाला समजल्यानंतर प्राचार्यांनी एमबीएच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पीडित विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढून टाकले. तिचे मूळ कागदपत्र तिच्या मूळ गावी पोस्टाने पाठवण्यात आले आहे. ही माहिती समजताच पीडित विद्यार्थिनीचे शैक्षणिक आयुष्य संपुष्टात आल्याने तिने पुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला प्रकार सांगितला.
याबाबत बोलताना हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे म्हणाले की, शेवाळवाडी येथील एक महाविद्यालयातील तरुणीने विनयभंग केल्याची तक्रार 15 दिवसांपूर्वीच दिली आहे. त्यानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य व संचालकावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महाविद्यालय पीडित विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढून टाकल्याची माहिती मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणाबाबत बोलताना अरहम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे संचालक अनिल त्रिपाठी म्हणाले की, तक्रार करणा-या विद्यार्थिनीने व तिच्या सहकाऱ्यांनी इन्स्टिट्यूट मध्ये काही दिवसापूर्वी वाद घालून कार्यालयात तोडफोड केली होती. याबाबतचे सर्व पुरावे आमच्याजवळ आहेत. तसेच याची पोलीस ठाण्यात एनसी तक्रार दिली आहे. त्या कारणामुळे तिला व तिच्या सहकाऱ्याला रिस्टिकेट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन चुकीची तक्रार देऊन ब्लॅकमेल करत आहे. इन्स्टिट्यूटने विद्यार्थिनी सहित तिच्या सहकाऱ्याला सुद्धा रिस्टीकेट करण्यात आले आहे. ही कारवाई विद्यालय प्रशासनाने नियमाप्रमाणे केलेली आहे.