पिंपरी : दहा जणांच्या टोळक्याकडून एका मुलांसह ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना पाईट रोडवर बुधवारी (दि. २५) सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबई येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय नागरिकाने महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी प्रितम अनंत जाधव, एक महिला आरोपी, अनंत सिताराम जाधव, प्रसाद बाळू मरगज, अभिषेक बाळू मरगज (सर्व रा. पाईट रोड, ता. खेड, जि. पुणे) तसेच त्यांचे पाच साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या जागेतून जाणारा पाण्याचा पाइप लिकेज होऊन चिखल झाला होता. त्यामुळे फिर्यादी यांनी तो पाइप दुरूस्त करून घ्या, असे प्रितम आनंत जाधव यांना सागितले. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करत दगड फेकून मारले. फिर्यादी यांच्या दोन्ही मुलांनाही हाताने मारहाण केली.
तसेच, फिर्यादी हे साक्षीदार यांच्या सोबत प्रितम जाधव याच्या विरुध्द तक्रार देण्यास जात होते. या कारणावरुन चिडून प्रितम जाधव याचे वडील अनंत सिताराम जाधव याने इतर उर्वरीत आरोपींनी बेकायदा जमाव करुन फिर्यादी यांची रिक्षा अडवून त्यांना हाताने, लाथाबुक्याने मारहाण केली आहे.
याच्या परस्पर विरोधात ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक दत्तू तुळवे, सुरज अशोक तुळवे, तोलानी, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घराशेजारी ग्राम पंचायतची पाईप लाईन लिकेज असल्याच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. महाळुंगे पोलिस तपास करत आहेत.