पुणे : पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातून ही घटनासमोर आली आहे. आपसी वादातील एक केस सॉल्व करताना पोलिसांना या घटनेला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार येरवडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडला. विशेष म्हणजे, महिला पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून त्यांना धमकावण्याचा प्रकार पोलीस ठाण्यातच घडला. यात पोलिसांना शिवीगाळ, मारहाण आणि उद्धट वर्तन करण्यात आले.
नेमक काय घडल?
मिळालेल्या माहितीनुसार, निखील गुरव याने मनोज महाले याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीला बोलवण्यासाठी पोलीस गेले असता मनोज महालेने पोलीसांशी उद्धट वर्तन केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात निखील व त्याच्या वडिलांच्या अंगावर धावून जाऊ लागले. तेव्हा फिर्यादी समजावण्यासाठी गेले असताना मनोज महाले याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. हे सगळे घडत असताना दिपाली महाले यांनीही पोलिसांना शिवीगाळ केली. हे पाहून पोलीस निरीक्षक कांचन जाधव व महिला शिपाई शिरसाट या दिपाली महालेला समजावण्यासाठी गेल्या. तेव्हा दिपाली महाले हिने पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांची कॉलर पकडून तु मला जास्त शिकवायचे नाही असे म्हणून महिला शिपाई शिरसाट यांना हाताने मारहाण केली. यावेळी झटापटीमध्ये फिर्यादीच्या गणवेशाच्या शर्टचे बटण तोडून कायदेशीर कर्तव्य करण्यास अडथळा आणला.
तिघांना अटक केली
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. मनोज महाले (वय ४२), दिपाली महाले (वय ४२), राधेय महाले (वय १८, रा. शासकीय वसाहत, शास्त्रीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार येरवडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडला. याबाबत पोलीस शिपाई सोमनाथ अशोक भोरडे यांनी फिर्याद (गु. रजि. नं. ८२५/२३) दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने प्रकरणाचा तपास करीत आहेत.