लोणी काळभोर : जल जीवन मिशन योजनेचे काम सुरु असताना आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील एका शेतकऱ्याची पाईपलाईन फुटली होती. त्यानंतर ही पाईपलाईन दुरुस्त न करताच तशीच गाढण्यात आली. या फुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी थेट शेतात घुसून पालक पिकाचे नुकसान झाले आहे. तर शेताकडे जाणारा खाजगी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विजय सुरेश जवळकर (वय-48) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विजय जवळकर यांचे आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गट 1118 क्र मध्ये 2 एकर शेती आहे. या शेतात त्यांनी पालक पिक घेतले होते. दरम्यान, नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे. यासाठी जल जीवन मिशन योजनेतून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) गावासाठी 55 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.
याचे काम एप्रिल 2024 महिन्यात झाले. हे काम सुरु असताना शेतकऱ्याची रस्त्यालगत असलेली पाईपलाईन ठेकेदाराकडून फुटली. शेतकऱ्याची फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून पुन्हा गाढण्याची जबाबदारी ठेकेदार व कंपनीची होती. मात्र, फुटलेली पाईपलाईन ठेकेदाराने थेट तशीच बुजविली.
फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी शेतकरी विजय जवळकर यांच्या शेतात घुसल्याने त्यांचा 2 एकर मधील पालक सडला आहे. त्यामुळे त्यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शेतात जाण्यासाठी 2 लाख रुपये खर्च करून रस्ता तयार केला होता. मात्र, या पाण्यामुळे हा रस्ता देखील वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकरी विजय जवळकर हे दुहेरी संकटात सापडला आहे.
पेयजल योजनेचे काम दिलेल्या कंपनीला हाताशी धरून ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. पाईपलाईन फुटली होती, त्यावेळी दुरुस्त करावी. अशी विनंती देखील केली होती. मात्र त्यांनी पाईपलाईन दुरुस्त न केल्याने आज माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत सदस्य व ठेकेदार आहेत. त्यामुळे मला त्वरित नुकसान भरपाई मिळावी.
विजय जवळकर (शेतकरी -आळंदी म्हातोबाची, ता. हवेली)
याबाबत ठेकेदार व कंपनीला वेळोवेळी पाईपलाईन फुटल्याच्या सूचना दिल्या आहे. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शंकर जवळकर (उपसरपंच, आळंदी म्हातोबाची
रस्ता व पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळाली आहे. पुढील दोन तीन दिवसात नवीन लोखंडी पाईपलाईन बसविण्यात येईल. रस्ताही दुरुस्त करण्यात येईल.
दिलखुश कुमार (सुपरवायझर – एबीएम प्रा. ली कंपनी गुडगाव, दिल्ली)