अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीतील वजन काट्यामध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसवून फेरफार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेजेल प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीतील वजन काट्यामध्ये फेरफार करण्याच्या उद्देशाने वजन काटा ऑफिसमधील डिस्प्ले स्क्रीनला रिमोटद्वारे ऑपरेट होणारे बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसविताना मिळून आले आहेत. बनावट इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस हे त्यांनी कंपनीचे डिसेंबर २०२४ मधील स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले सोनाक्षी इंटरप्राईजेस अहमदाबाद, गुजरातचे रोहित पटानी (रा. गुजरात) यांच्या सांगण्यावरून आरोपींनी हे काम केले.
कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या स्क्रॅपचे वजन हे डिस्प्ले स्क्रीनमध्ये फेरफार करून वजन कमी दाखवून सोनाक्षी एंटरप्राईजेसचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी आरोपी सौरभ सतीश यादव (वय 23 वर्षे रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहिल्यानगर), सुमंत मंजुनाथ गौडा (वय 23 वर्षे रा. हाऊसिंगीफारम तालुका जि. शिमोगा), रोहित पटाने रा. गुजरात. (पाहिजे आरोपी) यांनी हे फेरफार केले.
त्यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सौरभ व सुमंत या दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी रघुनाथ विद्याधर (वय 55 वर्ष, रा. गिरीकुंज हाउसिंग सोसायटी, तुळशीबाग वाले कॉलनी सहकार नगर 2 पर्वतीपुणे) यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उप अधीक्षक प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय शिंदे, अभिमान कोळेकर, विलास आंबेकर, प्रविण पिठले, राजू ढगे, विलास सरजिने यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे करत आहेत.