लोणी काळभोर : कुंजीरवाडी-तरडे रस्त्यावर डंपर व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आयडिया -वोडाफोन टावरजवळ रविवारी (ता. 5) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचावरील चालक गंभीर जखमी झाला आहे.
सजित रसूल मुलाणी (वय-45, रा. वळती, ता. हवेली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सजित मुलाणी हे वळती येथील रहिवासी असून ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त कुंजीरवाडी कडे रविवारी (ता. 5) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. दरम्यान, त्यांची दुचाकी तरडे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आयडिया -वोडाफोन टावरजवळ आली असता, कुंजीरवाडी कडून तरडे गावाच्या दिशेने जाणाऱ्या डंपरची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर डंपर चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे.
या अपघातात सजित मुलाणी हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर लोणी काळभोर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडत असल्याने मुलाणी यांना पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव करीत आहेत.