पुणे : राज्य शासनाकडे छत्रपती शिवरायांचा व छत्रपती शंभूराजांचा दैदीप्यमान इतिहासाचा वसा व वारसा जतन व्हावा या दृष्टिकोनातून स्वराज्य संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन मंगळवारी (ता. ११) देण्यात आले आहे.
यावेळी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विश्वविक्रम कीर्तनकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, कार्याध्यक्ष व जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे, पुणे जिल्हाध्यक्ष माऊलीआबा कुंजीर, अध्यात्मिक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोडके, थेऊरचे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रादयाचे भुषण असलेले विना, पगडी, चिपळ्या, उपरणे, हार घालून सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जानेवारी महिन्यात, श्रीक्षेत्र देहू, आळंदी येथे येण्याचे निमंत्रण शिष्ट मंडळाकडून देण्यात आले. यावेळी यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळून द्यावा व शिवजयंती शाळा कॉलेजेस शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी.
२) छत्रपती शिवराय व छत्रपती शंभुराजे यांचा दैदिप्यमान इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.
३) श्रीक्षेत्र वढू व श्रीक्षेत्र तुळापूरला विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून द्यावा.
४) छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करावी.
५) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी.
६) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण, श्री.शिवनेरीगड व छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म ठिकाण श्री. पुरंदरगड असे नामकरण करावे. या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.